"राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून काहीही चांगलं झालं नाही. हे लोक काही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय?" असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पर्यटकांना गडकिल्ल्यांची माहिती आणि सुविधा देण्यासाठी ही 'नमो केंद्र' उभारली जात आहेत. मात्र, 'शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र' उभारण्याला राज ठाकरेंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याच विरोधावरून श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले.
advertisement
"महायुतीने गडकिल्ल्यांचं किंवा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम केलं. त्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात. मात्र कधीकाळी यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केलं होतं," अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून देत त्यांच्यावर टीका केली.
"उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास उरला नाही"
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. अतिवृष्टीच्या वेळी महायुती सरकारने ३८ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
"लोकांना कोण खरं, कोण खोटं, कोण देणार आहे, कोण घेणार आहे... हे सगळं माहीत असतं. आता ते (उद्धव ठाकरे) दौरे करत आहेत, निवडणुकीपूर्वी काहीतरी आश्वासने देतील. मात्र, लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिला नाही," अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. आमचे कार्यकर्ते जेव्हा शेतकऱ्यांच्या भेटीला गेले, तेव्हा सोबत काही ना काही घेऊन गेले होते. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
"युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील"
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रयत्न महायुतीचा असेल, पण ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना असतील, त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील," असंही त्यांनी सांगितलं.
