नेमकं काय घडलं?
श्रीरामपूर येथील गोपीनाथ नगरमध्ये राहणाऱ्या मीना राजेंद्र सोनार या शुक्रवारी दुपारी आपले पती राजेंद्र नारायण सोनार यांच्यासोबत दुचाकीवरून चांदा गावाकडे निघाल्या होत्या. चांदा येथे त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता. पूर्ण कुटुंब घरी नातवाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असतानाच, नेवासे रोडवरील ओव्हरब्रिजवर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने (क्रमांक MH 41 AU 9267) भीषण धडक दिली.
advertisement
जागीच झाला मृत्यू
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर मीना सोनार या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती राजेंद्र सोनार हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या घरात नातवाच्या वाढदिवसाची गाणी वाजणार होती, तिथे आता आईच्या निधनाचे वृत्त समजताच हंबरडा फुटला आहे.
वाहतुकीचा खोळंबा अन् नागरिकांचा संताप
अपघातानंतर ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी संबंधित ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या ओव्हरब्रिजवर होणारे अपघात आणि जड वाहनांचा वाढलेला वेग यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा असा करुण अंत झाल्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
