सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली.या घोषणेला अवघे काही तास उलटले असतानाच खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी माहितीचा जागा वाटप फॉर्मुला जाहीर केला आहे. मात्र या फॉर्म्युल्यानंतर अवघ्या तासातच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिलेल्या राजीनाम्यात मी ओरोस मंडळ अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला आता उचित वाटत नाही, यासह माझा कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही तरी माझा हा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सादर केलाय ही माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
43 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा
ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोसमंडळ मधील ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव याच्यासह ओरोस मंडळ मधील बूथ अध्यक्ष शक्ति केंद्रप्रमुख, असे मिळून 43 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पार्टीत नाराजीनाट्य
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकत्रित निवडणुका लढवत आहेत याबाबत आजच खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीत नाराजी नाट्य पाहायला मिळतय.
