सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बेकायदेशीर लोन मंजूर करणाऱ्या फायनान्स कंपनीमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ब्रँच मॅनेजरसह एकूण १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एचआरचा सुद्धा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. किश्त फायनान्स कंपनीमध्ये बेकायदेशीर लोन मंजूर करण्यास नकार दिल्याने महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे, या कंपनीच्या निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहे.
advertisement
कार्यालयामध्ये पीडित मुलीला बेकायदेशीरपणे लोन मंजूर करण्यास सांगितलं होतं. पण तिने नकार दिल्यामुळे तिच्यावर दबाव टाकण्यात आला. कार्यालयातील ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्ले यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पीडित महिलेनं या प्रकरणी एचआरकडे तक्रार केली. पण पीडितेच्या तक्रारीची दखल न घेता उलट पीडितेलाच ‘अशा मुली कॅरेकटरलेस असतात’ अशी शेरेबाजी एचआरने केली. या प्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीचे सोलापूर ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एचआरवर सुद्धाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कार्यालयात एकच महिला
धक्कादायक बाब म्हणजे, या कार्यालयात एकूण 14 व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती. तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूम देखील व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायला जाताना आरोपींनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.
मागील अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकारमुळे पीडित तरुणी ही प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेत पीडित तरुणीचे मानसिक समुपदेशन केल्याने अनर्थ टळला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
