उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्यानंतर त्या मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांनी उमेदवारी भरू नये, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करत असल्याचा आरोप थिटे यांनी केला. अर्ज भरायला जातानाही रस्त्यावर राजन पाटील यांनी जागोजागी लोकांना उभे करून आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे थिटे म्हणाल्या. तसेच राजन पाटील यांच्याकडून आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती थिटे यांनी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागितलं होतं. बंदूकधारी व्यक्ती सोबतीला घेऊन त्यांनी अर्ज भरला होता.
advertisement
उमेदवारी अर्जावर सूचकाची सहीच नाही
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला
निवडणूक अधिकारी काय म्हणाले?
अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांच्या अर्जावर पाच हरकती घेतल्या. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक यांची सही नव्हती. त्यांच्या अर्जावर प्रभाग क्रमांक चुकीचा होता. त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा होता. त्यांच्या वयाचा पुरावा त्यांनी दिलेला नव्हता. सूचक यांचा अनुक्रमांक चुकीचा होता, अशा पाच हरकती सरस्वती शिंदे यांनी घेतल्या होत्या. या हरकतींच्या अनुषंगाने आम्ही पडताळणी केली असता, त्यावेळी तीन दोष आम्हाला तांत्रिक स्वरूपाचे दिसून आले. किरकोळ हरकती आम्ही विचारात घेतले नाही. सूचकाची सही नव्हती, ही विचार करण्याजोगी हरकत होती. प्रत्येक अर्जावर उमेदवाराची सही आणि सूचकाची सही बंधनकारक असते. त्यामुळे आम्ही त्यांचा अर्ज बाद ठरवला.
