सोलापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं एक खास नातं आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशाचं महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होतं. मुंबईतील चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी यानंतर सोलापुरात प्रेरणाभूमी आहे. हीच प्रेरणाभूमी आज देखील आंबेडकर अनुयायांनी प्रेरणा देण्याचं काम करतेय. याबाबतच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांच्याकडून जाणून घेऊयात.
advertisement
बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण
6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. पांजरापोळ चौकातील सी नरसी ट्रान्सपोर्टमध्ये निरोप आला. ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरु जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण अबुटे, मेसा सिद्धगणेश, दराप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. 7 डिसेंबर रोजी लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेबांनी मुक्काम केलेलं गंगा निवास, सोलापुरात आजही जपलाय ऐतिहासिक ठेवा!
सोलापुरात आणला अस्थिकलश
सोलापुरातील आंबेडकर अनुयायी तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईतच राहिले. त्यांनी सोलापुरात अस्थिकलश आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बोलणी करून 11 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांच्या अस्थी सकाळी 8 वाजता मद्रास मेलने सोलापुरात आणण्यात आल्या. तेव्हा आंबेडकर अनुयायांनी याठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती, असेही बनसोडे सांगतात.
प्रेरणाभूमीतून प्रेरणा
जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य खर्ची घातलं. अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून क्रांती आणण्यासोबतच त्यांनी सर्वांना समतेचा अधिकार मिळवून दिला. त्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती झाली. अशा थोर महामानवाच्या अस्थी सोलापुरात आहेत. मुंबईची चैत्यभूमी आणि नागपूरची दीक्षाभूमी नंतर सोलापूरची प्रेरणाभूमी भीम अनुयायांचं प्रेरणास्थान आहे. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी येताता, असेही बनसोडे यांनी सांगितले.