सोलापूर : - शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेत डौलाने फिरणारे नंदीध्वज हे खेळणी आणि नागफणीमुळे आकर्षित दिसतात. गेल्या 90 वर्षांपासून गणेचारी कुटुंब खेळणी आणि नागफणी बनविण्याची सेवा देत आहे. खेळणी आणि नागफणी बनवण्यासाठी गणेचारी कुटुंब रमले आहे. या संदर्भात अधिक माहिती विनायक गणेचारी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
नंदीध्वजाला बांधण्यात येणारे खेळणी, नागफणी बनविण्याचा मान हा गणेचारी कुटुंबाला आहे. कै. मल्लिकार्जुन गणेचारी यांचा बाळीवेस येथे 1925 पासून जमा-खर्च वह्यांचा व्यवसाय होता. त्यांना नंदीध्वजाला आकर्षक सजावट करण्याची आवड होती.
त्यातून खेळणी बनविण्याची कला अवगत झाली. मूळ व्यवसाय करत असताना त्यांनी वर्षातून 15 दिवस श्री सिध्दरामेश्वरांची सेवा करण्याचा निर्धार करीत 1935 पासून दरवर्षी यात्रेत मानाचा पहिला आणि दुसरा, सहावा आणि सातवा नंदीध्वजाला खेळणी अर्पण करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आजतागायत गणेचारी कुटुंबातील चौथी पिढी हे काम करत आहे.
श्री सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज खेळणी आणि नागफणीमुळे आकर्षक दिसतात. हे बनविण्यासाठी बांबूच्या कामट्या, पट्ट्या आणि वेताची छडी हे मुख्य साहित्य लागते. सोलापुरातील बुरूड गल्लीतून बांबूची उपलब्धता होते. मात्र वेत पुणे, मुंबई येथून मागविले जाते. त्याचबरोबर सजावटीसाठी लागणारी दुपटी, रंगीत आणि सोनेरी कागद, सुपारी हे साहित्य दिल्लीहून आणले जाते, अशी माहिती विनायक गणेचारी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.





