लग्नात हवेत गोळीबार करण्यासाठी बंदूक घेतली?
सिकंदरने मुंबईजवळ एका मित्राच्या लग्नात हवेत गोळीबार करण्यासाठी ही शस्त्र मागवली असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आता सिकंदरची रवानगी कारागृहात करण्यात आलीय. पंजाबमध्ये सिकंदरला मोहाली पोलिसांनी खरड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक केली होती, सिकंदरच्या दोन लाखाच्या डीलविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
advertisement
दोन लाखामध्ये दोन शस्त्र
सिकंदर शेख गेले सहा महिने पंजाबच्या मोहालीमध्ये कुस्तीची तयारी करत होता. त्यावेळी त्याच्यासोबत जे पैलवान होते, त्यांनी कुतूहलापोटी तुला शस्त्र घेऊन देऊ शकतो, असं सिकंदरला गुर्जर नावाच्या पैलवानाने त्याला सांगितलं होतं. यामध्ये सिकंदरने दोन लाखामध्ये दोन शस्त्र खरेदी केली होती. त्यापैकी सिकंदरने 40 ते 45 हजार रूपये दिले होते. एक शस्त्र गुर्जर ठेवणार होता, जी बोअर पिस्टल होती. सिकंदरने पाकिस्तानी ग्लॉबची कार्बन कॉपी पिस्तुल मागवली होती, अशी माहिती मिळाली आहे.
राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिंकदरचे संबंध?
अटक झालेल्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पैलवान सिकंदर शेख आणि आणखी तीन जणांचा समावेश आहे. ही टोळी शस्त्र पुरवठा, खून आणि खंडणीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार पिस्तुल (.32 बोर), एक पिस्तुल (.45 बोर), काडतुसे, रोकड आणि दोन लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पाच अवैध शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिंकदरचे संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
सिकंदर शेखला अडकवलंय का?
सिकंदरला शेखला न्यायलयीन कोठडी मिळाली होती. सिकंदरची पत्नी त्याला भेटून चंदीगडवरून पुण्याला रवाना झाली असून सिकंदरचे मित्र अजून मोहालीमध्येच आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक पैलवान गुन्हेगारी वर्तुळात आल्याचं दिसून आलं होतं. अशातच सिकंदर शेखला अडकवलंय का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. प्रसिद्ध वस्ताद काका पवार यांनी देखील सिकंदर असं करणार नाही, असं म्हणत त्याची बाजू मांडली होती.
सिकंदरला न्यायलयीन कोठडी
दरम्यान, या प्रकरणामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्य़ाशी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी संपर्क साधला होता. सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं होतं. त्यानंतर सिकंदरला जामीन मिळाला नाही तर त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. गुरूवारी सिकंदरला जामीन मिळेल, अशी शक्यता आहे.
