माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके या तीन नेत्यांनी यंदाची निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. यामुळे यांचे कार्यकर्ते आतापासूनच दंड थोपटत आहेत. प्रशांत परिचारक हे गेल्या 10 वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. जिल्ह्यात सर्वात आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काळाची पाऊले ओळखली होती. यानंतर भाजपमध्ये प्रवेशासाठी अक्षरशः रांगा लागल्या. मात्र, मागील 5 वर्षांत राजकीय घडामोडींनी राज्य ढवळून निघाले. आता भाजपमध्ये जाण्याची स्पर्धा संपली असून आहे, त्या नेत्यांना रोखण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर परिचारक यांनी भाजपचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्याविरोधात लढण्याचे थेट संकेत दिले आहेत.
advertisement
विधानसभा पोटनिवडणुकीत आवताडे यांच्यासाठी माघार घेतली असल्याने आता त्यांची थांबण्याची तयारी नाही. या दृष्टीने त्यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात आपल्या समर्थकांच्या बैठका सुरू केल्या आहेत. याला मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांनी त्यांनी अपक्ष किंवा तुतारी घेऊन लढण्याचा सल्ला दिला आहे. परिचारक देखील आक्रमक झाले असून आता कार्यकत्यांना इतरांच्या दावणीला बांधणार नसल्याचे जाहीर सभेत सांगत आहेत. परंतु, कोणत्या पक्षाकडून लढणार याचे पत्ते त्यांनी राखून ठेवले आहेत.
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा 2019 साली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा 2021 साली पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना जिंकून आणून प्रशांत परिचारक यांनी काढला असला तरी विधानसभा निवडणुकीत स्वतः प्रशांत परिचारक यांना यश प्राप्त झालेले नाही. 2009 साली ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि 2014 साली स्वतः प्रशांत परिचारक यांचा झालेला पराभवाचा हिशोब येणाऱ्या 2024 साली विधानसभा जिंकून चुकता करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक अश्या मातब्बर संस्था असताना आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना थेट जनतेतून विधानसभा जिंकावी असे पांडुरंग परिवारातील नेते मंडळी यांना वाटत आहे.
वाचा - बीडच्या सुपारी फेक प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2 नेत्यांची घेतली नाव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाशी चार हात लांब ठेऊन वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पक्ष डावलून प्रशांत परिचारक यांना तिकीट देतील याची शाश्वती नसताना आणि सद्यस्थितीत महायुतीला पोषक वातावरण नसताना वेगळा विचार करतील का? की स्वतः भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमाणे पक्षात राहून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याप्रमाणे खासदारकी सारखी आपले बंधू उमेश परिचारक यांना तुतारी हातात देऊन आमदार म्हणून निवडून आणतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
