गुरुवारी सकाळी ठीक 6 वाजता या मोहिमेला प्रारंभ झाला. साक्षीची आई सरस्वती माडे व स्वातंत्र्यसैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता फुलारी यांच्या उपस्थितीत या आव्हानाला सुरुवात झाली. अत्यंत चपळाईने आणि डोळ्यांचे पातेही न लवता साक्षीने सलग 12 तास दांडपट्टा चालवून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. ‘ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे निरीक्षक महंमदरफी शेख यांनी या विक्रमाची प्रत्यक्ष नोंद घेतली.
advertisement
साक्षीचे वडील एका पेट्रोल पंपावर कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत साक्षीने गेल्या पाच वर्षांपासून मर्दानी खेळांचा सराव केला आहे. तिचे मार्गदर्शक विवेक मिस्कीन, संगीता फुलारी आणि योगीनाथ फुलारी यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याचे साक्षीने अभिमानाने सांगितले.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत आणि राधिका चिलका यांच्या हस्ते साक्षीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. "केवळ स्वतःसाठी नाही, तर इतर मुलींना प्रेरणा देण्यासाठी मी हा प्रवास सुरू केला," असे सांगत, उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनून देशसेवा करण्याचे ध्येय तिने व्यक्त केले आहे. तिच्या या यशाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





