शाब्बास पोरी! आई गृहिणी, वडील पेट्रोल पंपावर कामाला, लेकीनं शिवजयंतीला केला वर्ल्ड रेकॉर्ड!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Shiv Jayanti 2026: अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत साक्षीने गेल्या पाच वर्षांपासून मर्दानी खेळांचा सराव केला. आता तिने जागतिक विक्रम केला.
सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवकालीन मर्दानी खेळाचा वारसा जपत, सोलापूरची कन्या साक्षी माडे हिने 19 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. सलग 12 तास 12 मिनिटे आणि सेकंद अविरत दांडपट्टा फिरवून तिने नवा इतिहास रचला आहे. या देदिप्यमान पराक्रमाची अधिकृत नोंद ऑरेंज बुक ऑफ मलेशिया आणि ‘ग्रीन बुक ऑफ मलेशिया’मध्ये करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी ठीक 6 वाजता या मोहिमेला प्रारंभ झाला. साक्षीची आई सरस्वती माडे व स्वातंत्र्यसैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता फुलारी यांच्या उपस्थितीत या आव्हानाला सुरुवात झाली. अत्यंत चपळाईने आणि डोळ्यांचे पातेही न लवता साक्षीने सलग 12 तास दांडपट्टा चालवून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. ‘ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे निरीक्षक महंमदरफी शेख यांनी या विक्रमाची प्रत्यक्ष नोंद घेतली.
advertisement
साक्षीचे वडील एका पेट्रोल पंपावर कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत साक्षीने गेल्या पाच वर्षांपासून मर्दानी खेळांचा सराव केला आहे. तिचे मार्गदर्शक विवेक मिस्कीन, संगीता फुलारी आणि योगीनाथ फुलारी यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याचे साक्षीने अभिमानाने सांगितले.
advertisement
या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत आणि राधिका चिलका यांच्या हस्ते साक्षीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. "केवळ स्वतःसाठी नाही, तर इतर मुलींना प्रेरणा देण्यासाठी मी हा प्रवास सुरू केला," असे सांगत, उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनून देशसेवा करण्याचे ध्येय तिने व्यक्त केले आहे. तिच्या या यशाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
शाब्बास पोरी! आई गृहिणी, वडील पेट्रोल पंपावर कामाला, लेकीनं शिवजयंतीला केला वर्ल्ड रेकॉर्ड!





