मनमोहक सुगंध आणि शुभ्र रंगामुळे मोगऱ्याच्या हारांना विशेष मागणी आहे, तर विविध रंगांचे गुलाब नवरा-नवरीच्या हारासाठी आणि आकर्षक झेंडूच्या माळा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांचे दर अचानक वाढले आहेत. विशेषतः मोगऱ्याच्या दराने तर उच्चांक गाठला आहे.
advertisement
सध्या मोगरा फुलाचे दर 600 ते 700 रुपये किलो, निशिगंध 200 ते 250 रुपये किलो तर 20 ते 30 रुपये किलो दर असलेला झेंडूचा फुल सध्या 50 ते 60 रुपये किलो मिळत आहे. तसेच गुलाब फुलाचे दर सुद्धा वाढलेले असून 100 रुपये किलो दराने मिळणारा गुलाब आता 150 रुपये किलो दराने मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. फुलाच्या बागेला जास्त पाणी लागते. सध्या सोलापूर जिल्ह्यात वाढलेली तीव्रता पाहता फुल बागेला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात फुले खराब होण्याची शक्यता जास्त असते. पण बाजारात सध्या मागणी असल्याने फुलांना चांगला दर मिळत आहे.
विवाहसमारंभात हारांसाठी खास मोगरा, गुलाब आणि झेंडू वापरले जात असून, त्यांची मागणी अधिक आहे. नवरा-नवरीच्या हारास प्रति जोडी 600 रुपये ते 900 रुपये दर आहेत. फुलांचे दर सुद्धा वाढलेले असले तरी सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत मोगरा, गुलाब, झेंडू या फुलांना जबरदस्त मागणी आहे. ग्राहक वाढलेल्या दरातही आनंदाने खरेदी करत आहेत.