सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात त्यांनी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांच्या प्रतिकारामुळे ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले. स्वातंत्र्यपूर्व काळात कापड उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या सोलापूरमध्ये 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
advertisement
या हुतात्मांनी उभारलेल्या लढ्यामुळे सोलापूरकरांनी स्वातंत्र्याच्या 17 वर्ष आधीच म्हणजे 1930 साली 4 दिवस स्वातंत्र्य अनुभवले होते. याबाबत अधिक माहिती सोलापूरचे जेष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सोलापूर हे स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीयदृष्ट्या जागरुक शहर होते. महात्मा गांधी यांनी 1930 साली सविनय कायदेभंगाची हाक देशवासियांना दिला. त्यांच्या हाकेला सोलापूरकरांनीही प्रतिसाद दिला. 9, 10, 11 आणि 12 मे अशी चार दिवस सोलापूर स्वतंत्र होते. सोलापूरच्या नगरपरिषेदेवर हे चार दिवस तिरंगा फडकत होता.
सोलापूरकरांचा हा लढा दडपून काढण्यासाठी ब्रिटीशांना शहरात ‘मार्शल लॉ’ ची घोषणा करावी लागली. या चळवळीतील क्रांतीकारी तरुण मल्लप्पा धनशेट्टी ,श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटीशांनी फासावर लटकवलं. त्यांचे स्मरण म्हणून सोलापूरमध्ये 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
काय घडला घटनाक्रम? -
गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना 4 मे 1930 रोजी अटक करण्यात आली. ही बातमी सोलापुरात 5 मे 1930 रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली. 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. शहरात शांतता राहावी यासाठी काही प्रमुख क्रांतीकारांना ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. त्यापैकी प्रमुख 8 मे 1930 रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपवून नेते मंडळी परतली.
दरम्यान, काही तरुण रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. तरुण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आले होते. आंदोलनकर्त्याच्या दगडफेकीत DSP फ्लेपेअर आणि 3 पोलीस जखमी झाले. पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला. मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता. पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या, अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते.
त्याचवेळी शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला. तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जिवीतास धोका असल्याचे वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली. शिवदारे जागीच कोसळले आणि देशासाठी बलिदान देणारे सोलापूरचे ते पहिले हुतात्मा ठरले.
खिल्लार गायींच्या गोमुत्रातून लाखोंची उलाढाल, सोलापुरातील भाऊ-बहिणीची कमाल!
मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखले आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र, यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात, अशी कलेक्टर नाईट यांची धारणा बनली. संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला. पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिले.
तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिले. दोन पोलीस कर्मचारी यात मृत्युमुखी पडले. शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचे काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवले होते. पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर 12 मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झाले. मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात 13 मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा यांना तर 14 मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली.
या चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता, ते पटवून दिलं आणि यानंतर या चार वीरांना 12 जानेवारी रोजी पुण्यातील येरवडा कारागृह येथे फाशी देण्यात आले.
12 जानेवारीलाच फाशी का दिली?
सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात गड्डा यात्रा असते. या यात्रेनिमित्त वेगवेगळ्या भागातील भाविक शहरात येत असतात. त्या सर्वांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक 12 जानेवारी रोजी या क्रांतीकारकांना फाशी दिली. त्यांच्या फाशीनंतर 900 वर्षांमध्ये पहिल्यांदाच त्यावर्षी गड्डा यात्रा झाली नाही. संपूर्ण सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली.