नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. गल्लीबोळातले पोरं रस्त्यावर मारामाऱ्या, गुंडगिरी आणि चोरीच्या घटनांनी नाशिकमध्ये उच्छाद मांडला आहे. या सगळ्या गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी नाशिक पोलिसांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला' अशी मोहिमच हाती घेतली आहे. 'कोयता टाकून डोकं खोलतो' असं नाशिकच्या गुन्हेगारीवर इंन्स्टाग्रामवर रील बनवणाऱ्या रीलस्टारला नाशिक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. या रिलस्टारचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
advertisement
नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. मिसरुडं फुटलेली पोरं इन्स्टाग्रामवर रील बनवून एकमेकांनाा धमक्या देत आहे. दोन मुलींची रील व्हायरल झाली होती. त्यानंतर आता अशाच एका तरुणाला आणि त्याच्या गँगची नाशिक पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली. धिंडही अशी काढली की, या रिलस्टारला रस्त्यावर चालताही येत नव्हतं.
काही दिवसांपूर्वी या रिलस्टारने इंन्साटाग्रामवर एक रील बनवली होती. यामध्ये तो नाशिकची गुन्हेगारी म्हणत मी साधा नाही डॉन, कोयत्याने डोक खोलतो, असं रॅप साँग म्हणत होता. पोलिसांनी या रीलची दखल घेतली आणि या रिलस्टारला ताब्यात घेतलं. त्याच्यासोबत त्याच्या पंटरांनीही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टाईलने पाहुणचार झाल्यानंतर या सगळ्यांची त्यांच्याच परिसरात धिंड काढण्यात आली होती. यावेळी रॅप साँगमध्ये गँगस्टर समजणाऱ्या रिलस्टारला रस्त्यावर चालणंही कठीण झालं होतं. 'नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला, असे व्हिडीओ कुणीही बनवू नका, नाशिक काय भारतात कुठेही बनवू नका' अशी विनवणीच हा रिलस्टार करत होता.
आधी शिव्या अन् धमकी नंतर 2 तरुणींनी मागितली माफी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या रिलस्टार प्रमाणेच २ तरुणींनी धमकीवजा रील केली होती. ही रील नाशिकमध्ये चांगलीच व्हायरल झाली होती. या तरूणींनाही नाशिक पोलिसांनी चांगला धडा शिकवला. 'हे नाशिक आहे भावा, तू येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटंल' #नाशिक असं या रीलमध्ये म्हटलं होतं. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेतलं आणि कडक कारवाई केली. त्यानंतर या दोन्ही तरुणींनी हात जोडून माफी मागितली.