राज्यातील ऊर्जा विभागाच्या कामकाजावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ऊर्जा विभागावर त्यांनी थेट टीका करत, शेतकऱ्यांच्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी अपुरी असल्याचा आरोप केला.
सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटले?
विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, "शेतकरी विद्युत पंपाची मागणी करत आहेत, पण महावितरणकडून सोलर पंप घ्या असा आग्रह केला जातो. मात्र, प्रत्यक्षात सोलर पंप वर्षानुवर्षे दिले जात नाहीत," अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.
advertisement
मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं की, "राज्यात सध्या ४७ हजार सोलर पंपसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत. कामाचा वेग इतका संथ आहे की, या अधिकाऱ्यांना 'नोबेल पुरस्कार' द्यायला हवा!" असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. चंद्रपूर जिल्ह्यात सोलर पंप बसवले गेले, मात्र ते नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठं आहे. सीआरआय कंपनीचे हे सोलर पंप आहेत आणि गुणवत्तेचा अभाव स्पष्ट आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
त्यांनी पुढं म्हटले की, "पंतप्रधान सोलरला प्रोत्साहन देतात हे मान्य आहे. पण फक्त शेतकऱ्यांनाच सक्ती का? जर खरोखर सोलरला प्रोत्साहन द्यायचं असेल, तर मंत्रालय सोलरवर चालवा, विधानभवन सोलरवर करा," असा जोरदार सवाल उपस्थित करत मुनगंटीवारांनी सरकारलाच अडचणीत आणले.
सरकारने काय म्हटले?
सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले. याबाबत बैठक लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. जिथे सोलर चालत नाही तिथे विद्युत कनेक्शन द्यायचा प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले.