माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुमाचे उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहचल्या. यावेळी स्थानिक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात फोन दिला. तर अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही, म्हणून रागावलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. याच कॉलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या दादागिरवरून अंधारे यांनी थेट सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
advertisement
सरकारच जर गुंडांना अभय देणारे असेल तर...
अधिकाऱ्यांना झापणे, पदाचा रुबाब दाखवणे, कधीकधी शिवीगाळ करणे, याबाबतच्या बातम्या आत्तापर्यंत फक्त संजय शिरसाट, संजय गायकवाड, अनिल बोंडे, गीता जैन, संतोष बांगर , अमित साटम, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर यांच्याबाबत येत होत्या. पण असे का होते त्याचा उलगडा आज झाला. सरकारच गुंडांना अभय देणारे असेल तर त्यात सामील असणाऱ्या मंत्री किंवा आमदारांकडून अपेक्षा वेगळी ती काय करायची? असे म्हणत अजित पवार यांच्या दादागिरीचा अंधारे यांनी निषेध केला. महिला डीवायएसपीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून गुंडांना सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. खरंतर अशा धाडसी पोलीस अधिकाऱ्याचे आपण कौतुक करायला हवे, असेही अंधारे म्हणाल्या.
महिला पोलीस अधिकाऱ्याने फक्त फोन कॉलवर कुणाला का सोडावे हा साधा प्रश्न आहे? बरं ज्याच्या संदर्भात कॉल केलेला आहे तो कोणी सद्गुणी संत महापुरुष आहे का? तर तसेही नाही. समजा एका फोन कॉलवर सोडून दिले. पण उद्या जर लक्षात आले की असा कुठलाही कॉल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलाच नव्हता तर मग, पोलिस अधिकाऱ्याला दिवसा ढवळ्या गुंडांनी चुना लावल्याच्या बातम्यांची रंगतदार चर्चा वाढेल ती वेगळीच... त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट येईल त्याची जबाबदारी कोण घेणार?
CM म्हणजे कॉमन मॅन, DCM म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असे जाहिरातीमध्ये सांगणारे सरकार DCM म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असं काही वास्तवात आहे का? असा सवाल करून अंधारे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अजित पवार महिला डीवायएसपीला नेमके काय म्हणाले?
अजित पवार बोल रहा हूँ... ये कारवाई बंद करो, मेरा आदेश है... त्यावर अंजना कृष्णा म्हणतात-मेरे फोन पर आप कॉल करो.. त्यावर पवार म्हणतात.. मैं तुम पे अॅक्शन लूंगा. इतनी डेअरिंग है तुम्हारी, मेरा चेहरा तो पेहचानोगी ना.. अशा अतिशय हिणकस शब्दात अजित पवार यांनी महिला डीवायएसपीशी संवाद साधला.