याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्णपुऱ्यातील 5 ते 6 एकर परिसरात नवरात्रौत्सव आणि विजयादशमीनिमित्त 11 दिवस देवीची यात्रा भरवण्यात येणार आहे. या यात्रेत सुमारे 800 ते 1 हजार लहान-मोठे व्यावसायिक सहभागी होतात. छावणी परिषदेअंतर्गत हा परिसर येतो. येथे भरवण्यात येणारी यात्रा व पार्किंगसाठी दरवर्षी टेंडर काढलं जातं. दरवर्षी यात्रा आणि पार्किंगचं टेंडर वेगवेगळं काढलं जात होतं. पण, यंदाच्या वर्षी हे टेंडर एकत्रित काढण्यात आलं आहे.
advertisement
यात्रा भरण्याची जागा आणि पार्किंगची जागा एकत्रित करून 84 लाख 51 हजार रुपयांचं टेंडर निघालं आहे. टेंडरची सर्व रक्कम छावणी परिषदेच्या तिजोरी जमा होणार आहे. शिवाय, टेंडरवरती 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. एकूण जीएसटी हा 15 लाख 21 हजार 180 रुपये आहे. हा जीएसटी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहे. मूळ टेंडर आणि जीएसटी मिळून कर्णपुरा यात्रेसाठी यावर्षी एकूण 99 लाख 72 हजार 180 रुपये टेंडर घेणाऱ्यांना भरावे लागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचं टेंडर वाढलेलं आहे. मागील वर्षी छावणी परिषदेला 76 लाख 25 हजार रुपये मिळाले होते. यंदा या टेंडरद्वारे 84 लाख 51 हजार रुपये मिळणार आहेत.