किरण शिंदे असं हल्ला झालेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. त्या अंबरनाथमधील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट आहेत. पतीनेच घरगुती वादातून थेट खलबता मारत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. त्यांच्या मुलाने बचाव केल्याने डॉ. शिंदे यांचा जीव वाचला. त्यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिम येथील गृहसंकुलात पती आणि दोन मुलांसह राहतात. गेल्या काही काळापासून त्या आणि त्यांचे पती यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. बुधवारी सकाळी डॉ. किरण या घरात गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि पती विश्वंभर शिंदे यांच्यासाठी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. यावेळी त्यांच्यात मित्राने सोशल मीडियावर कॉम्प्लिमेट दिल्याच्या कारणातून वाद झाला. याच वादातून विश्वंभर यांनी स्वयंपाकघरात येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडला आणि त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने जीवघेणी मारहाण सुरू केली. घाबरलेल्या डॉ. किरण यांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मुलांनी स्वयंपाकघरात धाव घेत आईची सुटका केली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉ. किरण यांना तात्काळ बदलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती विश्वंभर शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
