ठाणे जिल्ह्यामध्ये ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये तो दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्या दुचाकीस्वाराला रुग्णालयामध्ये घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एका 29 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. भिवंडी परिसरातील निंबवली नाक्यावर सोमवारी संध्याकाळी अपघाताची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यूमुखी पडलेला 29 वर्षीय तरूण हा पेशाने अभियंता आहे. वाशिंदमधील एका कंपनीमध्ये हा तरूण कामाला होता. सोमवारी संध्याकाळी कामावरून सुटून तो मोटारसायकलवरून कशेळी गावी घरी परतत असताना एका ट्रकने त्याला धडक दिली.
advertisement
ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. मृत दुचाकी स्वाराचं नाव विनोद पाटील असं आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीच्या दुचाकीला ट्रकची धडक लागली. या धडकेमध्ये तो तरूण खाली पडला आणि अचानक तो त्या ट्रकच्या एका चाकाखाली आला, त्यामुळे तो चिरडला गेला. त्याने हेल्मेट देखील घातले होते. तरी सुद्धा त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या तरूणाला ट्रकच्या खालून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.
परंतू, ठाणे- भिवंडी मार्गावर प्रचंड कोंडी असल्यामुळे ॲम्ब्युलन्स अडकली. त्यामुळे विनोद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, ट्रक चालक फरार आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.