ठाणे : गोकुळाष्टमीनिमित्त घराघरात प्रसन्न वातावरण आहे आणि बाजारपेठाही छान सजल्या आहेत. नाक्या-नाक्यावर लगबग पाहायला मिळतेय दहीहंडी प्रॅक्टिसची. आपले थर आणि हंडी हटकेच असायला हवी असा सर्व पथकांचा हट्ट असतो. यात तरुणांसह ज्येष्ठ मंडळी पुढाकार घेतातच, शिवाय चिमुकल्या गोविंदांचा उत्साह काही कमी नसतो. तुम्ही मुंबईत किंवा उपनगरात राहत असाल तर दहीहंडीसाठी सुरेख आणि स्वस्त साहित्य कुठं मिळतं हे आज आपण पाहणार आहोत.
advertisement
ठाण्यातील विठ्ठल मंदिर गल्लीच्या मार्केटमध्ये अतिशय आकर्षक अशा रंगीबेरंगी दहीहंडी मिळतात. या हंड्यांची किंमत सुरू होते फक्त 200 रुपयांपासून. इथलं नॅशनल मडके भांडार हे दुकान प्रचंड प्रसिद्ध आहे जे 60 वर्षांच्या प्रतिमा आजी सांभाळतात.
नॅशनल मडके भांडार दुकानात 200 रुपयांपासून हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत दहीहंडी मिळतात. त्यांचा रंग आणि सजावट अतिशय देखणी असते. या हंड्यांवर वेगवेगळ्या डायमंड्सची कलाकुसर असते. लहान मुलांसाठीदेखील इथं दहीहंडी मिळतात.
'आमचं दुकान 100 वर्षे जुनं आहे. दहीहंडीसाठीची सगळी मातीची मडकी आम्ही घरी बनवतो. मडक्यांसाठी जी माती वापरली जाते ती उत्तम दर्जाची असल्यामुळे मडक्यांना सहज तडे जात नाहीत. ठाण्यातील अनेक दुकानदारही इथून हंडी घेऊन जातात', अशी माहिती नॅशनल मडके भांडार दुकानाच्या दुकानदार प्रतिमा आजी यांनी दिली. त्यामुळे तुम्हालाही चांगल्या दर्जाची सुंदर दहीहंडी खरेदी करायची असेल तर या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता.