केंद्र सरकारच्या सडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन निधीतून या महामार्गावरील अनेक विकास प्रकल्प राबवले जात आहेत. पावसाळा संपल्यानंतर कामांना वेग आला असून काही प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहेत. नुकतीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत महामार्गावरील विविध कामांचा आढावा घेण्यात आला आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला.
advertisement
दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळणे, रस्ते खचणे, अपघात होणे आणि वाहतूककोंडी अशी गंभीर परिस्थिती निर्माण होत असे. मात्र, आता मजबुतीकरण, कॉक्रीटीकरण आणि संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.
या प्रकल्पांतर्गत घाटातील रस्त्याचे कॉक्रीटीकरण, मास्टिक डांबर लावणे, नवीन संरक्षणभिंती बांधणे, स्लोप प्रोटेक्शन आणि स्ट्रक्चरल मजबुतीकरणाची कामे केली जात आहेत. यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार कमी होतील आणि रस्त्याची टिकाऊपणा वाढेल.
केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून वनविभाग आणि भूसंपादन विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर अनेक रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत. पुढील काही महिन्यांत हा घाटमार्ग पूर्णपणे नव्या रूपात खुला होणार असून कल्याण ते नगर प्रवास आता अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे.