कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या भेटीकडे राजकीय अंगाने बघितलं जात आहे. या भेटीनंतर भोईर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुभाष भोईर भाजपात गेले तर भाजप एका दगडात दोन पक्षी मारू शकतो, असं बोललं जातंय.
advertisement
याचं कारण म्हणजे सुभाष भोईर हे शिवसेना ठाकरे गटाचे विश्वासू नेते मानले जातात. शिवसेना पक्ष फुटीनंतरही त्यांनी कायम उद्धव ठाकरेंचे साथ दिली. शिवाय ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधकही आहेत. अशात सुभाष भोईर भाजपात गेले, तर उद्धव ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसू शकतो. शिवाय भोईर यांच्या रुपाने भाजपला मोठं बळ मिळून ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढू शकते. यामुळे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी भाजपनं केली आहे का? अशीही चर्चा आता रंगली आहे.
ठाणे आणि कल्याण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांनी फडणवीसांची घेतलेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. भोईर यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेतल्याचे बोलले जात आहे. भोईर यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. मात्र कल्याण ग्रामीण तसेच ठाणे आणि कल्याण महापालिकांच्या क्षेत्रात भोईर यांनी प्रतिनिधीत्व केलं आहे.
