ठाणे : सध्या मुंबईत खूप कमी ठिकाणी घरगुती जेवण मिळतं. पण दादरमध्ये असेच एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला शुद्ध तुपातलं आणि उत्तम दर्जाचं घरगुती जेवण मिळेल. दादर स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या रानडे रोडवर श्री स्वामी समर्थ गृह उद्योग नावाचे दुकान आहे. याठिकाणी तुम्हाला अगदी घरगुती असं जेवण मिळेल.
advertisement
मागील अनेक वर्षांपासून अश्विनी मेणकुरकर या हे गृह उद्योग चालवतात. अश्विनी यांनी 2011 ला या गृह उद्योगाची स्थापना केली. 2011 पूर्वी त्या घरामध्येच लोकांना डब्बा वगैरे बनवून द्यायच्या. परंतु आपला काहीतरी व्यवसाय असावा, दादरमध्येच चांगल्या प्रतीचे अन्न लोकांना मिळावे, यासाठी गृह उद्योग स्थापन करावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी आपली फॅमिली आणि भावाच्या मदतीने 2011 मध्ये या श्री स्वामी समर्थ गृह उद्योगाची स्थापना केली.
या दुकानात रोज वेगवेगळी मेन्यू असतात. यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी या तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या मिळतात. जर कोणाचा काही कार्यक्रम असेल तर त्या ऑर्डरदेखील अश्विनी स्विकारतात. महाराष्ट्रीयन फूडसाठी श्री स्वामी समर्थ गृह उद्योग ओळखला जातो. या दुकानात मिळणारे मोदक आणि पुरणपोळी दादरकरांचे पसंतीच्या गोष्टी आहेत.
मोदकांची किंमत तर फक्त 30 रुपये आणि दोन पुरणपोळ्यांची किंमत फक्त 70 रुपये आहे. पुलाव भात, झुणका भाकरी, वांग्याचे भरीत, मसूरची भाजी यांची किंमत फक्त 60 ते 70 रुपये आहे. हे इथे मिळणारे पदार्थ दादरकरांचे फेवरेट पदार्थ झाले आहेत.
काय म्हणाल्या अश्विनी मेणकुरकर -
'माझा प्रवास फार सोप्पा नव्हता. आजही मी माझ्या मुलींना शाळेत सोडून मग या दुकानात येते. माझ्या भावाचा हा गृह उद्योग चालवण्यात खूप मोठा वाटा आहे. मी यापुढेही कायमच लोकांना चांगलं अन्न देण्यासाठी काम करेन,' अशी प्रतिक्रिया या गृह उद्योगाच्या प्रमुख अश्विनी मेणकुरकर यांनी दिली.
तुम्हालाही स्वस्त दरात उत्तम दर्जाचे जेवण करायचे असेल तर तुम्ही अश्विनी यांच्या दादरमधील श्री स्वामी समर्थ अश्विनी गृह उद्योग दुकानाला नक्की भेट देऊ शकतात.





