महानगरपालिकेच्या खर्चातून हे रुग्णालय उभारण्यात आले. आधुनिक उपकरणे, वॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि आयसीयू विभागासह हे रुग्णालय कार्यान्वित करण्याचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात आयसीयू सुरू न झाल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक सांगतात की हे रुग्णालय उभारल्यानंतर काही काळच सुरळीत सेवा देण्यात आली. पण त्यानंतर यंत्रसामग्रीचे देखभाल न झाल्याने आयसीयूतील उपकरणे निष्क्रिय झाली. त्याचबरोबर आवश्यक तांत्रिक कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांची कमतरता असल्याने हा विभाग बंद ठेवण्यात आला आहे.
advertisement
महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार या दोघांमध्ये जबाबदारी ढकलण्याचे खेळ सुरू आहेत. नागरिकांच्या जीवाशी निगडित असलेला प्रश्न वर्षभर प्रलंबित राहणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.
दरम्यान नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली गेली तरीही केडीएमसी प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. रुग्णालयाचे दरवाजे मात्र उघडे असले तरी अत्यावश्यक विभाग बंद असल्याने त्याचा काही उपयोग होत नाही.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, ''कोट्यवधी रुपये खर्चून जर अशी इमारत उभारायची आणि ती वापरायचीच नाही, तर हा पैसा वाया गेला.'' अनेकांनी याविषयी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेने तातडीने आयसीयू सुरू करून नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत.