हे आहे नवीन एसटीचे ठिकाण
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण एसटी डेपोचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 6 नोव्हेंबरपासून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस कल्याण एसटी डेपोतून नव्हे तर दुर्गाडी येथून सुटणार आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दुर्गाडी गाठावी लागणार आहे.
advertisement
या कारणांमुळे घेतला निर्णय
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मंगळवारी संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात एसटी डेपो परिसरातील कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या जुन्या एसटी डेपोतून बस सुटल्याने वाहतुकीत मोठी कोंडी होत आहे आणि प्रकल्पाचे कामही अडथळ्यात येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बससाठी तात्पुरता पर्याय म्हणून दुर्गाडी ठिकाण निवडण्यात आले आहे.
महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले की, दुर्गाडी परिसरात पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. कल्याण एसटी डेपोचे व्यवस्थापक महेश भौये यांनी सांगितले की, दिवाळी काळात वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस 6 नोव्हेंबरपासून दुर्गाडी येथून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जुन्या डेपोच्या जागी नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे.
पूर्वी या भागात बॅडमिंटन कोर्टाजवळून लांब पल्ल्याच्या बस सुटत होत्या. मात्र आता त्या जागेवर विकासकाम सुरू असल्याने दुर्गाडी हा पर्याय निवडण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभ्या असलेल्या रिक्षांचे नियोजन आरटीओ आणि वाहतूक पोलिस प्रशासन करणार आहेत.
दरम्यान, सुभाष चौक परिसरातील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. ऑप्टिकल इमारतीच्या न्यायालयीन प्रकरणामुळे काही अडथळे आले होते. मात्र आता परळीकर मार्गावरून रामबाग रस्त्याद्वारे सुभाष चौकापर्यंत एकदिशा वाहतूक सुरू करून पुलाच्या उताराचे काम गतीमान करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
तसेच वालधुनी ब्रीज दुरुस्तीचेही काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. या सर्व निर्णयांमुळे कल्याण शहरातील वाहतूक आणि पायाभूत सुविधा सुधारण्यास गती मिळणार आहे.
