यावर्षीही 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठाण्यात वाहतुक बदल लागू राहतील. या कालावधीत मासुंदा तलाव, राम मारूती रोड, गडकरी चौक, घंटाळी मंदिर चौक, गजानन महाराज चौक आणि आसपासच्या भागात गर्दी अपेक्षित आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुक सुरळीत चालावी यासाठी ठाणे पोलिसांनी ठोस उपाययोजना केल्या आहेत.
वाहतुक बदल खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
1) डाॅ. मूस चौक – गडकरी चौक मार्ग: डाॅ. मूस चौकाजवळून गडकरी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. या मार्गावरून जाणारी वाहने टावरनाका व टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.
2)गडकरी चौक – डाॅ. मूस चौक मार्ग: गडकरी चौकाजवळून डाॅ. मूस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. याठिकाणी वाहने अल्मेडा चौक, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप आणि हरिनिवास मार्गे वाहतुक करेल.
3)घंटाळी मंदिर चौक – पु. ना. गाडगीळ चौक मार्ग: घंटाळी मंदिर चौकाजवळून गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. वाहने घंटाळी पथ मार्गे वाहतुक करतील.
4)गजानन महाराज चौक – तीन पेट्रोल पंप मार्ग: या मार्गावरून गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक मार्गे किंवा घंटाळी मंदिर मार्गे वाहतुक करतील.
5)राजमाता वडापाव सेंटर – गजानन महाराज चौक मार्ग: राजमाता वडापाव सेंटर दुकानाजवळून गजानन महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. याठिकाणी वाहने गोखले रोड मार्गे वाहतुक करु शकतील.
ठाणे पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की हे मार्गदर्शन लक्षात घेऊन वाहन चालवावे. गर्दीच्या काळात सुरक्षित अंतर ठेवावे आणि वाहतुक नियमांचे पालन करावे. यामुळे दिवाळी पहाटचा आनंद आणि उत्सव सुरळीतपणे पार पडेल.