प्राथमिक माहितीनुसार, ही थार कार सहा जणांना घेऊन रायगड ते पुणे या दिशेने ताम्हिणी घाटातून जात होती. घाटात एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. घटनेची वेळ रात्रीची असल्याने कोणालाही अपघाताची कल्पना तात्काळ आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कारमधील व्यक्तींशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल थांबले असल्याचे दिसून आले. यानंतर शोधमोहीम तातडीने सुरू करण्यात आली.
advertisement
मदत-बचावकार्य सुरू, चार मृतदेह सापडले...
सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली. दरीच्या कठीण उतारांमध्ये रोप्सच्या साहाय्याने उतरत बचाव पथकाने शोधमोहीम राबवली. या शोध मोहीमेदरम्यान आज सकाळी थार कारचे अवशेष आढळले. बचाव पथकाला चार मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दोन प्रवाशांचा अद्याप कोणताही मागमूस लागलेला नाही. या दोघांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. घटनेच्या दोन दिवसानंतर अपघाताची माहिती समजल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
