कष्टाचे साम्राज्य, पण नशिबाचा क्रूर खेळ
या अपघाताला केवळ दुर्घटना नाही, तर ती सहा धडपड्या तरुणांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची दुर्दैवी कहाणी आहे. या तरुणांनी एकत्र येऊन व्यावसायिक होण्याचे मोठे स्वप्न पाहिले होते. गरीब कुटुंबातून आलेल्या या मित्रांनी भागीदारीत चार मोमोज सेंटर उभे केले. उत्तमनगर-कोपरे परिसरात सुरू केला. कष्टाला पर्याय नाही हे ओळखून त्यांनी आपल्या व्यवसायाचा काही प्रमाणात विस्तारही केला होता आणि पुण्यात त्यांनी ४ ठिकाणी 'मोमो स्टॉल' उभे केले होते. व्यवसायाला नुकतेच यश मिळायला लागले होते आणि आयुष्यात आता कुठे स्थैर्य येत आहे, याचा आनंद त्यांनी एकत्र साजरा करावा याच हेतूने ते सर्व कोकण पर्यटनाला निघाले होते. मात्र, काळाने त्यांना वाटेतच गाठले आणि व्यवसाय विस्ताराची त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
advertisement
रिक्षाचालकाचा मुलगा ते मोमो किंग
या तरुणांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आणि संघर्षमय होती. साहिलचे वडील रिक्षा चालवत होते, प्रथमचे वडील टेम्पो चालवून कुटुंबाचा गाडा हाकत होते, तर शिवाच्या आई पूजेचे साहित्य आणि हार विकून कुटुंबाला हातभार लावत होत्या. इतरांचे कुटुंबीयही अत्यंत सामान्य स्तरातील होते. आई-वडिलांना मदत करण्याच्या उद्देशानेच या तरुणांनी मोमो विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्यातील काही जण शिक्षणही घेत होते, पण त्याच वेळी व्यवसाय करून ते कुटुंबाला आधार देत होते.
पहिली सहल ठरली शेवटची
कष्टाच्या पैशातून यश मिळाल्यानंतर यातील एका तरुणाने नुकतीच नवीन थार गाडी खरेदी केली होती. ही त्यांची पहिली मोठी खरेदी होती आणि या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी याच गाडीतून कोकणची पहिली सहल काढली. व्यवसायात व्यस्त असल्याने एका वेळी सर्वांना जाणे शक्य नव्हते, म्हणून सहा जण कोकणला निघाले, तर इतर मित्र पुण्यात व्यवसायाची जबाबदारी सांभाळत थांबले. मात्र, ही सहल त्यांच्या आयुष्याची शेवटची ठरली. एका नवीन प्रवासाची आणि व्यवसायाच्या विस्ताराची स्वप्नं पाहणाऱ्या या मित्रांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
