नऊ दिवस नवरात्रातील बंजारा समाजाची निसर्गपूजेची आगळी परंपरा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यासह संपूर्ण भागात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्सवात बंजारा समाजाची परंपरा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे.
गरबा खेळताना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतोय? वेळीच करा हे उपाय, Video
नवरात्रामध्ये देवीची पूजा तर केली जातेच, पण त्याहूनही जास्त निसर्गाला देव मानून त्याची आराधना केली जाते. "गेल्या हजारो वर्षांपासून आमच्या समाजाची ही आगळीवेगळी परंपरा चालत आली आहे," असे गोर सेनेचे पदाधिकारी रमेश पवार यांनी सांगितले. नवरात्रीमध्ये बंजारा समाज झाडे, झुडपे, वेली, पशुपक्षी तसेच पंचमहाभूतांना पूजनीय मानतो. निसर्गाशी घट्ट नातं जोडून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे समाजातील वयोवृद्ध सांगतात. निसर्गाची पूजा करून सर्व जीवजंतूंच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते.
advertisement
मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर...
नवरात्रातील या पूजेमुळे समाजामध्ये एकोपा, ऐक्य आणि निसर्गसंवर्धनाबद्दल जागरूकता टिकून राहते. शारदीय नवरात्रींच्या दिवसांमध्ये विविध धार्मिक विधींसोबतच समाज एकत्र येतो. शेवटच्या दिवशी खास करून बकरे कापून मांसाहारी जेवण केले जाते. या जेवणामध्ये "सळई" हा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी सळईशिवाय जेवण अपूर्ण असल्याचे मानले जाते. हा प्रसादसदृश्य अन्नपदार्थ समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग बनला आहे. नवरात्रात देवीची पूजा करताना बंजारा समाज “सेन साई वेस” हे ब्रीदवाक्य उच्चारतो. याचा अर्थ, "सर्वांना सुखी ठेव, सर्वांना समाधानी ठेव" असा आहे.
या प्रार्थनेतून सर्वांच्या कल्याणाचा आणि समाधानाचा संदेश दिला जातो. देवी-देवतांच्या पूजेबरोबरच निसर्गपूजेच्या माध्यमातून सर्वांना समानतेचा आणि सामंजस्याचा विचार रुजवण्याची परंपरा यातून दिसून येते. रमेश पवार यांच्यानुसार, बंजारा समाजाची ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी आहे. नवरात्राच्या निमित्ताने देवीची आराधना आणि निसर्गपूजा या दोन गोष्टींचा संगम घडवून समाजामध्ये श्रद्धा, संस्कार आणि निसर्गाविषयी कृतज्ञता निर्माण केली जाते. त्यामुळे बंजारा समाजाचा नवरात्र उत्सव हा निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ ठरतो.