याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गामुळे कोकणवासीयांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास या वाहतुकीला सोपा पर्याय उपलब्ध होईल.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या देखील मांडल्या. रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य आणि कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. शिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचवण्यास सुलभ आणि किफायतशीर मार्ग मिळेल. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. शिवाय, या रेल्वे मार्गामुळे पर्यटनाला देखील फायदा होणार आहे.