आत्मदहनाची पहिली घटना सकाळी 9 वाजता घडली. बांधकाम विभागात कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांचे दीड कोटी रुपयांचे देयक थकीत असून, संबंधित अभियंत्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जाते. कंत्राटदार बाबा जाकीर यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले.
advertisement
दीड कोटीचे बिल थकले...
बाबा जाकीर यांच्या दीड कोटी रुपयांच्या देयकांची फाइल महिन्यापासून प्रलंबित असून, कार्यकारी अभियंता अंभोरे यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा देखील आरोप आहेय. आज सकाळी त्यांनी बांधकाम विभागाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आणि तातडीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 20 दिवसांपूर्वीही बाबा जाकीर यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न करत बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली होती.
अवघ्या तासाभराने दुसरी घटना...
अवघ्या तासाभराने दुसरी घटना घडली. सकाळी 10 वाजता पाच वर्षांपासून वेतन न मिळाल्यामुळे दोन गटसचिव जितेंद्र तरासे आणि महेंद्र ठाकूर यांनी शहरातील आरती चौकात आत्मदहनाचा प्रयत्न केला. दीर्घकाळ पगार न मिळाल्याने वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. आत्मदहनााचा प्रयत्न असल्याचे दिसताच पोलिसांनी तातडीने दोघांना अटकाव केला आणि ताब्यात घेतले.
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे एकाच दिवशी तिघांकडून आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आणि संबंधित विभागांनी तपास सुरू केला आहे.