मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाजवळील रोडवरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. एक तरुण आणि तरुणी रस्त्यावर झटापटी करताना दिसत आहेत. हा तरुण त्या तरुणीला सोबत येण्यासाठी जबरदस्ती करत होता. पण ती तरुणी त्याला दूर ढकलत होती. पण त्याने तरुणीला जबरदस्तीने उचलून घेतलं आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसवलं आणि ते दोघे तरुणीला घेऊन दुचाकी घेऊन पसार होतात.
advertisement
हा प्रकार जेव्हा सुरू होता, त्यावेळी तिथे उपस्थितीत लोकांना हा प्रकार नेमका चालला काय हे कळत नाही. गर्दीतून एक जण त्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे येण्याची भाषा करतो. पण कुणीही पुढे यायला तयार होत नाही. मात्र,हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला. हा व्हिडीओ नांदेड शहरात व्हायरल झाला.
या व्हिडीओची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला. रात्री उशिरा या तरुणीची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ती तरुणी त्या तरुणांची कुणी होती का, की अन्य काही प्रकार आहे. याचा तपास आता पोलीस करत आहे.
