मुंबई : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. मागील पाच वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत . एकीकडे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना मधल्या काळात उधाण आले होते. आज पुन्हा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल, असे चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
भाजप आणि ठाकरे कुटुंबाची जवळीक पुन्हा एकदा सार्वजनिक सोहळ्यात दिसली. भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. त्यामुळेच राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर आणि नेते विनायक राऊत हे देखिल उपस्थित होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नं सोहळ्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची अनेक भाजप नेते मंडळींसोबत भेटीगाठी झाल्या . याच लग्नं सोहळ्यात भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासोबतही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट झाली. लग्नं सोहळ्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी हास्य विनोद करताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पक्ष उद्धव ठाकरेंना म्हणाले की, आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल. उद्धव ठाकरे यांनी ही हास्य विनोद करताना भाजपसोबत पुन्हा युती करण्यास दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का?
पराग अळवणी यांच्या मुलीचा विवाह सोहळा विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्यात अचानक भेट झाली. चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्या कानात काहीतरी कुजबूज झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काय कुजबूज झाली असे विचारले चंद्रकांत पाटलांनी युतीवर बोलल्याचे सांगितले. भाजप नेत्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात उपस्थिती, विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, फडणवीसांना शुभेच्छा देणे तसेच सामना अग्रलेखातून फडणवीस यांचं कौतुक या सर्व घडामोडींमुळे पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आले आहे.