राज्यात शिवसेना ठाकरे गटाशी संलग्न असलेल्या कामगार सेनेत आणि भाजपच्या नव्याने उभ्या राहिलेल्या कामगार संघटनेत मागील काही महिन्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भाजपने काही ठिकाणी ठाकरेंच्या कामगार सेनेचे वर्चस्व मोडीत काढत आपल्या यूनियन स्थापन केल्या आहेत.
ठाकरेंच्या कामगार सेनेला आव्हान...
कामगार सेना ही शिवसेनेच्या संघटनात्मक कणा मानली जाणारी महत्वाची शाखा आहे. हॉटेल्स, विमानतळ, कारखाने, मोठ्या कंपन्या आदी ठिकाणी कामगारांच्या हक्कांसाठी सतत सक्रिय असलेल्या या युनिट्समुळे शिवसेनेला त्या क्षेत्रात मजबूत पकड मिळालेली आहे. मात्र अलीकडे भाजपने स्वतःची कामगार संघटना उभारण्यास सुरुवात केल्यानंतर राजकीय स्पर्धा थेट कामगार चळवळीत उतरल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
या नव्या घडामोडींमुळे ठाकरे गट सावध झाला आहे. संघटनेतील शिस्त, ताकद आणि आगामी रणनीतीवर व्यक्तिगत पातळीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. कामगार सेनेशी संबंधितांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक बदल, नवीन सदस्य वाढ अभियान, कामगारांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि भाजपच्या आक्रमक पावलांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामगार सेना महत्त्वाची का?
कामगार संघटनांमधील राजकीय स्पर्धा वाढत असताना, ठाकरे गटाची ही बैठक शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. कामगार संघटनेतील सदस्य हा स्थानिक पातळीवरही शिवसेनेशी जोडला गेलेला असतो. त्यामुळे कामगार सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसल्यास त्याचे परिणाम स्थानिक पातळीवर होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आता कामगार क्षेत्रात भाजपच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: लक्ष घालत असल्याची माहिती समोर आली आहे.
