आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मातोश्रीवरून बैठकीचे निरोप पाठवण्यात आले. मुंबईतील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व लोकप्रतिनिधींना सेना भवनात तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने ती अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच पक्ष, युती आणि आघाडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत जागा वाटप, उमेदवारांची नावे तसेच युती-आघाडीच्या धोरणावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
विशेषतः मुंबईतील जागांबाबत कोण कुठून लढणार, यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे भवितव्य आजच्या बैठकीत ठरणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी गोंधळ टाळण्यासाठी पक्ष नेतृत्वाने ही बैठक बोलावल्याचेही बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात स्थानिक पातळीवरील अधिक समन्वयासाठी देखील काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे नाव स्पष्टपणे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेना भवनातील या बैठकीकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
