वक्फ बोर्ड विधेयकावरुन ठाकरे गटाला भाजप आणि शिंदे गटाने हिंदुत्वाच्या मु्द्यावर घेरले. सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले. आज मुंबईत मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत उद्धव यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, ईदवेळी या सर्वांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या. आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आहे. योगायोग आहे किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलं. रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचं एकेकाळी समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्धव यांनी पुढे म्हटले की, आमच्या पक्षाकडून काही सूचना मांडण्यात आल्या होत्या.मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
तुम्ही लहान असाल, बाळासाहेबांचे हिंदुत्व...फडणवीसांना प्रत्युत्तर
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत हिंदुत्वाच्या मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कदाचित त्यावेळी लहान असतील. 1995 मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर मुस्लिमांना इज्तेमासाठी जागा दिली होती. बीकेसीमध्ये मुस्लिमांचा इज्तेमा पार पडला होता. आता, तेच मैदान बुलेट ट्रेनसाठी देण्यात आल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्याशिवाय, युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना बोलावून अधिकृत सगळ्याच धर्माच्या प्रार्थनास्थळांना वाढीव एफएफआय देण्याची सूचना केली होती. त्यामुळे बाळासाहेबांचे हिंदुत्व मला सांगू नये असेही उद्धव यांनी ठणकावले.