मार्मिकच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरे यांनी लेख लिहिला आहे. मराठवाडा विदर्भासह राज्यातील २० जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. परंतु राज्य सरकारने अपुरी मदत जाहीर केल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये राज्य सरकारने धुळफेक केली आहे, असा आक्षेप नोंदवून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका केली आहे.
advertisement
कर्जमाफीचा आनंदी शिधाच मिळायला हवा होता
मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा त्यांचे दोन 'उप'टराव, त्यांचे राजकारण असंवेदनशील, निर्धावलेले आहे. ही दिवाळी मराठवाड्यातील शेतकरी दुखवट्यातच साजरी करणार. त्यांचे दुःख हलके करण्यासाठी कर्जमाफीचा आनंदी शिधाच मिळायला हवा होता. फडणवीसांनी पूरग्रस्त मदतीच्या पॅकेजमध्ये मोठी लबाडी केली. ३१,६२८ कोटी रुपयांची घोषणा केली. त्यातले फक्त ६५०० कोटी रुपये इतकेच खरे पॅकेज आहे. या पॅकेजमधून शेतकरी कर्जमाफीची मागणी टाळण्यात आली. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली. कर्ज काढून बियाणे, खते वगैरे विकत घेतली, ते सर्व पाण्यात वाहून गेले. हे कर्ज आता कसे फेडायचे? शेतीच नाही तर उत्पन्न कसले? त्याने जगायचे कसे? पोराबाळांना खायला काय द्यायचे? पण धड पोटापुरती मदत नाही आणि कर्जमाफी नाही. सरकारचे पॅकेज हीच सर्वात मोठी थाप आहे. अशा थापेबाजीचा जागतिक विक्रम महाराष्ट्र सरकारच्या नावावर जमा झाला आहे. माणसे आत्महत्या करोत, नाहीतर पूरपाण्यात वाहून जावोत, आम्हाला त्याचे काय? या मनोवृत्तीत सरकार मौजा मारत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
धनिक जैन समाज आज कबुतरांसाठी धर्मसभेचे आयोजन करतो पण....
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे पोट भरणाऱ्या राजधानी मुंबईची चारही बाजूंनी लूटमार सुरू आहे. मराठी माणसाला अक्षरशः नागवले जात आहे. मुंबईच्या उभारणीत कष्टकरी, शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. या मुंबईतला धनिक जैन समाज आज कबुतरखान्यांच्या रक्षणासाठी हिंसक बनला आहे. कबुतरखाने बंद केल्याने कबुतरे मेली, त्या कबुतरांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून धर्मसभेचे आयोजन मुंबईत होते, पण एक बेफाम उद्योगपती मुंबईचा मराठी आत्मा नष्ट करायला निघाला आहे, त्याविरोधात कोणतीही धर्मसभा आवाज उठवत नाही. मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून १०६ मराठीजनांचे बलिदान झाले, पण धर्मसभा आज कबुतरांच्या आत्मशांतीसाठी भरली आहे. यावरून ना आपले मराठी राज्यकर्ते स्वतःची आपटताना दिसत, ना बेगडी हिंदुत्ववादी या ढोंगावर प्रहार करत. जो तो आपल्याच मस्तीत मशगूल आहे.
एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सगळ्यांना दिवाळी सुखाची जावो
मराठी माणसाने देशासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढत राहायचं आणि त्याचा फायदा उपटायचा इतरांनी. हे अन्यायाचे टोक आहे त्या अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा यंदाच्या दिवाळीत मिळो. बळीचे खरेखुरे राज्य येऊ महाराष्ट्र धर्माचा विचार करणाऱ्या, त्यात धर्म रक्षणासाठी संघर्षाची तयारी करणाऱ्या 'जगेन तर महाराष्ट्रासाठी मरेन तर महाराष्ट्रासाठी' या निश्चयाने एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सगळ्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आरोग्याची विजयाची आणि स्वाभिमानाने जगण्याची जावो, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.