छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगडावर आले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, आमदार आणि मंत्री भरत गोगावले आदी नेते उपस्थित होते. अमित शाह यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून छोटेखानी भाषण केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून प्रमुख पाच मागण्या केल्या.
advertisement
साहित्य, शिवस्मारक आणि 'तो' कायदा... उदयनराजेंच्या पाच मागण्या
पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. कदाचित पर्यावरणासंबंधी काही अडचणी असतील, म्हणून स्मारकाचे काम होत नाही. पण महाराष्ट्रात राजभवनला ४८ एकर जागा आहे. तिथे शिवरायांचे विशाल स्मारक व्हावे, अशी मोठी मागणी उदयनराजेंनी अमित शाह यांच्याकडे केली. तसेच अमित शाह यांनी आजच्या भाषणातून त्याची घोषणा करावी, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा पार्श्वभूमीवर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराज यांचा अवमान होण्याच्या घटना वाढत आहेत. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेत शिवाजी महाराज यांचा सर्वमान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी शासनाकडून केली. शहाजी महाराजांच्या समाधीच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी द्यावा तसेच दिल्लीत भव्य शिवस्मारक स्थापन करावे आणि त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करा, अशा मागण्याही उदयनराजे भोसले यांनी केल्या.