नेमकं प्रकरण काय?
४ जानेवारी २०२६ रोजी उमरगा परिसरात एक बेवारस मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले, पण मारेकरी कोण? हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. घटनास्थळी पोलिसांना एक दारूची बाटली आणि तिचं झाकण सापडलं. हाच धागा पकडून पोलीस तपासासाठी 'ब्लॅकी'ला पाचारण करण्यात आलं.
झाकणाचा वास अन् तो रस्ता...
advertisement
ब्लॅकीने घटनास्थळावरील त्या बाटलीच्या झाकणाचा वास हुंगला आणि तो धावत सुटला. ज्या रस्त्याने आरोपी आले आणि गेले होते, तो संपूर्ण मार्ग ब्लॅकीने पोलिसांना दाखवून दिला. यामुळे तपासाची चक्रं वेगाने फिरली. संशयाची सुई मृताच्या पत्नीकडे वळली. पोलिसांनी जेव्हा अधिक तपास केला, तेव्हा पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं समोर आलं.
ओळख परेडमध्येही ब्लॅकीची 'कमाल'
पोलिसांनी संशयित म्हणून पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. मात्र, तांत्रिक पुराव्यासोबतच श्वान पथकाची खात्री पटवण्यासाठी एक 'ओळख परेड' घेण्यात आली. या परेडमध्ये अनेक व्यक्ती उभे असताना ब्लॅकीने थेट त्या प्रियकराला हुंगून त्याच्यासमोर बसकण मारली. ब्लॅकीच्या या अचूक खुणेमुळे पोलिसांचा संशय खात्रीत बदलला आणि आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
'ब्लॅकी'चे कौतुक
उमरगा पोलीस दलातील हा चार पायांचा 'शेरलॉक होम्स' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केवळ एका झाकणाच्या वासावरून पत्नी आणि प्रियकराचा हा क्रूर कट ब्लॅकीने उघड केला. या कामगिरीमुळे पोलीस दलातून ब्लॅकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
