महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. माझ्यासह जिल्हाध्यक्ष यांचसोबत इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख झालं आहे. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट असल्याचे वैभव खेडेकर म्हणाले आहेत.
मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकरांचं ठरलं, पुढची भूमिकाच सांगून टाकली
advertisement
भाजपच्या काही लोकांना भेटलो म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर ही कारवाई झाल्याचे वैभव खेडेकर सांगतात.पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्यावर तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो, असे स्पष्टीकरण खेडेकर यांनी भाजपमधील पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिले आहे. तसेच जिह्यातील विकासासाठी सत्ताधाऱ्यांची भेटीगाठी घ्यायचो. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाल्याचे खेडेकर सांगतात.
पण माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला,पण मला अद्याप भेट घेता आली नाही आहे. पण संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले.पण त्यात यश आले नाही.हे माझं दुर्दैव आहे, असे खेडेकर म्हणतात.
हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश असल्याचा आनंद बाळगला असता. पण पक्षाची शिस्त बिघडेल असे मी कधीच काम केले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली, आणि राज साहेब तुम्ही कालही मनात होता आजही आहात आणि उद्याही राहाल असे म्हणताना वैभव खेडकर भावूक झाले.
कोकणात मी पक्ष रुजवला
कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली. खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे राहिलं. मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो. तसेच पक्ष म्हणून कोकणात आघात झाले तेव्हा मी लोकांसोबत राहिलो. कोविड मध्येही देखील मी लोकांच्या सोबत होतो.त्यामुळे पक्ष रुजावा ही माझी भूमिका होती असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
'BJP च्या लोकांना भेटलो,पण पक्षप्रवेश...', मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर स्पष्टच बोलले
तीस वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो.आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला.आजच पत्र पाहून धक्का बसला.असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही.पुढील निर्णय घ्यावा लागेल.अजून निर्णय घेतलेला नाही, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.
फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन.माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याचीही वेळ आहे.झालेली घटना नाकारता येत नाही.हे स्वीकारून मी पुढे जाईल.मला अजिबात घाई नाही.मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईन, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत. तसेच लवकरच मेळावा घेणार, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या धोरणावरही टीका केली. तसेच राज ठाकरेंचा आमच्याकडे फोन नंबर नाही.केवळ मेसेज करू शकतो असा नंबर आमच्याकडे आहे, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.