रिक्षाचालकांच्या मनमानीला बसणार चाप
गेल्या काही वर्षांपासून वसई-विरारमध्ये रिक्षाचालक प्रवाशांकडून जास्त भाडे घेत होते. काही वेळा रिक्षामध्ये 3 ऐवजी ४ प्रवासी बसवले जात होते किंवा थोड्या अंतरासाठी देखील जास्त पैसे आकारले जात होते. नागरिकांकडून यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींमुळे भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याशी संपर्क साधला आणि रिक्षांवर लक्ष देण्याची विनंती केली.
advertisement
सरनाईक यांनी वसई-विरारच्या वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांचे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी रिक्षाचालक जास्त दर आकारतात आणि नियमांचे पालन करत नाहीत हा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर बैठकीत या समस्येवर विचार करून निर्णय घेण्यात आला की वसई-विरारमध्ये आता मीटर रिक्षाच धावतील.
कोणाला असणार हा निमय बंधनकारक
नवीन निर्णयानुसार रेल्वे स्थानकांपासून विविध भागांमध्ये जाणाऱ्या शेअर-ऑटो रिक्षा आधीच्या दरांवर चालू राहतील. पण स्वतंत्र प्रवास करणाऱ्या रिक्षांना आता मीटरवर चालवणे बंधनकारक असेल. मीटर दर न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल.
असे असतील रिक्षाचे नवे दर
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगावमध्ये 15 नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा सुरू होणार आहेत. मीटर रिक्षा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना योग्य दरावर प्रवास करता येईल. जसे की 1.5 किलोमीटर प्रवासासाठी दुपारी 26 रुपये, मध्यरात्री 29 रुपये दर आकारला जाईल. 4.10 किलोमीटर प्रवासासाठी दुपारी 70 रुपये आणि मध्यरात्री 88 रुपये भाडे मोजावे लागेल. 6.70 किलोमीटर प्रवासासाठी दुपारी 115 रुपये तर मध्यरात्री 144 रुपये भाडे लागू होईल.
या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रिक्षाचालक अधिक भाडे आकारू शकणार नाहीत. नागरिकांना योग्य दरावर प्रवास करता येईल आणि रिक्षामध्ये होणारी गैरव्यवहाराची स्थिती कमी होईल. हा निर्णय वसई-विरारच्या नागरिकांसाठी मोठा लाभदायक आहे.