नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवण केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांना उलटी आल्याने कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सामाजिक-राजकीय क्षेत्रात महत्त्वाची छाप सोडणारे ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन ही मोठी पोकळी निर्माण करणारी घटना ठरली आहे. 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जन्मलेले सुराणा यांनी विद्यालयीन काळातच राष्ट्रसेवा दलाशी जोडले जाऊन सामाजिक-राजकीय जीवनाची सुरुवात केली.
advertisement
तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात वास्तव्यास राहून भूदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे समाज प्रबोधन संस्थेचे सचिव, तसेच समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेकडे वळत 'मराठवाडा' दैनिकाचे संपादक म्हणूनही कार्य केले. शिक्षण, शेती, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर त्यांनी व्यापक आणि प्रभावी लेखन केले.
आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. जुना समाजवादी पक्ष, जनता पक्ष, तसेच पुरोगामी संघटनांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला. मराठवाड्यातील भूकंपानंतर सर्वस्व गमावलेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ सुरू केले. या माध्यामातून मराठवाड्यातील अनेक तरुण-तरुणींची आयुष्य घडली. भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. राजकारण, समाजकारण यांच्यात पूर्णवेळ गुंतलेले असताना त्यांनी आपले लेखन कार्यही सुरू ठेवले. ‘ज्ञानबाचं अर्थकारण’ हे त्यांचे पुस्तक अनेकांमध्ये जनजागृती निर्माण करणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.
सत्तर वर्षांहून अधिक काळ देशातील राजकीय–सामाजिक बदलांचे साक्षीदार राहिलेल्या सुराणा यांनी 'चले जाव' चळवळीपासून स्वातंत्र्योत्तर भारत, आणीबाणी आणि त्यानंतरच्या राजकीय प्रवासाचा अतिशय जवळून अनुभव घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
