महाविकास आघाडीला या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका उत्तर महाराष्ट्रात बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या 35 जागांपैकी फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी महाविकास आघाडीची लाज राखली. उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, जळगाव, धुळे या तीनही जिल्ह्यात महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. तर नंदुरबारमधून शिरीष नाईक यांच्या रुपात त्यांना एक जागा मिळाली.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फक्त दोनच जागा जिंकता आल्या नाहीत. यातल्या नवापूरच्या जागेवर महायुतीचा पराभव झाला, तर मालेगाव मध्य या मतदारसंघात महायुतीने उमेदवारच दिला नव्हता. मालेगाव मध्य मधून एमआयएमच्या मौलाना मुफ्ती यांचा विजय झाला आहे.
नवापूरमध्येही कांटे की टक्कर
नवापूरची जागा काँग्रेसने जिंकली असली तरी या मतदारसंघात कांटे की टक्कर बघायला मिळाली. मतमोजणीच्या शेवटच्या काही टप्प्यांमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित हे आघाडीवर होते. 23 व्या फेरीपर्यंत शरद गावित यांच्याकडे 197 मतांची आघाडी होती, पण 24 व्या फेरीमध्ये नाईक यांनी 525 मतांची आघाडी घेतली. यानंतर पोस्टल बॅलटची मतं मोजण्यात आल्यामुळे नाईक यांची आघाडी 1 हजार 100 मतांच्या पुढे गेली.
नवापूर मतदारसंघात शरद गावित यांच्या नावासोबत साधर्म्य असणारे आणखी एक अपक्ष शरद गावित रिंगणात होते. या अपक्षाला 1 हजार 14 मतं मिळाली. शिरीष नाईक यांच्याविरोधात पराभूत झालेले शरद गावित हे भाजपच्या विजयकुमार गावित यांच धाकटे बंधू आहेत. याआधी 2009 साली नवापूर मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते अपक्षच निवडणूक लढत आहेत.
