मुंबई माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली. अजित पवार यांना वेगळे लढायला लावून धर्मनिरपेक्ष मतात फूट पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा वेगळे लढण्यामागे भाजपचा प्लॅन
हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचे त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचे हा दुटप्पीपणा आहे. निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जवळ करायचे आणि मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांना स्वतंत्र निवडणूक लढवायला लावायची, महायुतीचे हे राजकारण लपून राहिलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून निवडणुका आल्या की हा वाद निर्माण केला जातो, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
advertisement
ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी झाले तर जबाबदारी कुणाची?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले अस भाजप सांगत होती. आता महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. पण उद्या कोर्टात जाऊन पुन्हा ओबीसींच्या जागांवरील निवडणुका रद्द झाल्या, त्यांचे प्रतिनिधित्व कमी झाले तर ही जबाबदारी कुणाची? निवडणुका झाल्या तरी ओबीसींवर टांगती तलवार आहे त्यांच्या जागांवर वरवंटा फिरणार आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
भाजपचा प्लॅन फेल करण्याचा आमचाही प्लॅन
राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन होऊ नये आणि भाजपला त्याचा फायदा होऊ नये अशी भूमिका सर्वांची आहे. महाविकास आघाडी एकत्र राहणार का याबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी निर्णय घेतील. स्थानिक नेते तिथली समीकरण पाहून निर्णय घेतील असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
