या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही. आता रस्त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे पैठण रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. साचलेल्या पाण्यामधून वाहनं काढण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं, अशी मागणी ग्रामस्थांनकडून केली जात आहे.
advertisement
Dahihandi 2025: यंदा 46 ठिकाणी रंगणार गोविंदांचा थरार, 1600 पोलीस कर्मचारी तैनात
ग्रामस्थ शिवाजी फांदडे लोकल 18 शी बोलताना म्हणाले, "पैठण रोडवरील चितेगाव येथे पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था ही सर्वात प्रमुख समस्या आहे. चितेगाव-पैठण रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा."
चितेगावमध्ये संत एकनाथ विद्यालय आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरात मोठे-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमधून आणि पावसाच्या साचलेल्या पाण्यामधून आपला जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेला येतात. विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो. शाळेत सुद्धा पाणी साचलेलं आहे. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.





