मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना एका वेगवान महामार्गाने जोडणारा हा प्रकल्प अर्थव्यवस्था आणि दळणवळणाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला असून, तब्बल 75 हेक्टरवरील 5043 खारफुटी या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) प्राधिकरणाने प्रकल्पाबाबत सुधारित प्रस्ताव मागविला आहे.
advertisement
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरे, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू), तसेच समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) यांना थेट आणि जलद जोडणी मिळणार आहे. या महामार्गावर सहा प्रमुख इंटरचेंज असून, नऊ प्रस्तावित ग्रोथ सेंटर्सना थेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.
आर्थिक विकासाला गती
या कॉरिडॉरमुळे मालवाहतूक सुलभ होऊन बंदरे, विमानतळ आणि औद्योगिक वसाहती यांच्यातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी उद्योगधंदे, लॉजिस्टिक्स, निर्यात-आयात क्षेत्राला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास प्रकल्प यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
खारफुटींच्या माहितीत तफावत
मात्र, या विकास प्रकल्पाबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालांमध्ये मोठी विसंगती आढळून आली आहे. मॅन्ग्रोव्ह सेलच्या अहवालानुसार या प्रकल्पामुळे 5043 खारफुटी झाडे बाधित होणार असून, त्यांचे क्षेत्रफळ 75.0531 हेक्टर इतके आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सादर केलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवालात बाधित क्षेत्र 59.23 हेक्टर दाखवण्यात आले असून, खारफुटींची नेमकी संख्या नमूद केलेली नाही.
याच तफावतीवर सीआरझेड प्राधिकरणाच्या तज्ज्ञ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात बाधित होणाऱ्या खारफुटींची अचूक संख्या, तसेच त्याच्या बदल्यात किती खारफुटींची लागवड केली जाणार आहे, यासह सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले आहेत.
असे असणार विरार-अलिबाग कॉरिडॉरचे रस्त्यांचे जाळे
1) नवघर (नवधर) ते दिवे-अंजूर :
हा मार्ग वसई तालुक्यातील बापाणे परिसरातून सुरू होतो. पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर पहिला इंटरचेंज देण्यात येणार आहे. पुढे दिवे गावाजवळ दुसरा इंटरचेंज असून, हा मार्ग अंजूर (ता. भिवंडी) येथे मुंबई-नाशिक महामार्ग (एनएच 848) ला जोडला जाईल.
2) दिवे-अंजूर ते काटई नाका :
या टप्प्यात कल्याण-शिळ आणि अंबरनाथ-शिळ मार्गावर महत्त्वाचा इंटरचेंज प्रस्तावित आहे.
3) काटई ते मोरखे :
या विभागात तळोजा आणि भोरवे येथे इंटरचेंज देण्यात येणार असून, औद्योगिक परिसरांना थेट जोड मिळणार आहे.
4) मोरखे ते मुंबई :
मोरखे येथील इंटरचेंज हा संपूर्ण प्रकल्पातील महत्त्वाचा दुवा असून, येथे पुणे एक्स्प्रेसवे, विरार-अलिबाग कॉरिडॉर, जेएनपीटी आणि वडोदरा एक्स्प्रेसवे एकत्र येणार आहेत. त्यामुळे जड व हलकी वाहतूक सुलभ होईल.
करंजाडे ते अटल सेतू :
या टप्प्यातून मुख्यत्वे अटल सेतू आणि जेएनपीटीमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक होणार आहे.
विकासासोबत पर्यावरणाचा तोल महत्त्वाचा
विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असली, तरी खारफुटींसारख्या संवेदनशील परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत स्पष्टता, पारदर्शकता आणि योग्य भरपाई उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. सीआरझेडकडे सादर होणाऱ्या सुधारित प्रस्तावानंतरच या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
