नवरात्रोत्सवाच्या तोंडावर आता नव्या वादाचे सूर उमटू लागले आहेत. विश्वहिंदू परिषदेनं गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. तसेच त्यांनी गरब्यात प्रवेश देताना काही अटींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामध्ये गरब्यात येणाऱ्या प्रत्येकांचं आधार कार्ड पाहून त्याला प्रवेश द्यावा, प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावण्यात यावा. तसेच प्रवेश करणाऱ्याच्या हस्ते वराह पूजन करावं. मुस्लिम गरब्यात आल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.
advertisement
गरब्यात इतर धर्मीय लोक खोटे नाव सांगून हाताला कलावा बांधून प्रवेश करतात, प्रेमाच्या जाळ्यात फसवतात नंतर लव्ह जिहाद सारख्या घटना घडतात, असे कारण देऊन गरब्यात मुस्लिमांना प्रवेश दिला जावू नये यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असणार आहे. विश्वहिंदू परिषदेनं ही भूमिका घेतल्यानंतर वादाला तोंड फुटलं नाही तरचं नवलं. या भूमिकेवर काँग्रेसंनं जोरदार टीका केलीय. गरबा हा उत्सव आहे, विविधतेत एकता हा पाया आहे, त्याला छेद देण्याच काम केलं जातंय, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
खरं तर गेल्या काही वर्षात विश्व हिंदू परिषदेकडून दरवर्षी अशा प्रकारचं आवाहन केलं जातंय. मुस्लिमांना गरब्यात प्रवेश देवू नये अशी विश्वहिंदू परिषदेकडून सतत भूमिका मांडली जातेय. यंदाही तोच कित्ता त्यांनी गिरवला आहे. पण यंदा वराह पूजनची नवी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी गरब्यात प्रवेश करताना प्रत्येकाला त्या तीन चाचण्यातून जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.