सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिणेकडे दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर उत्तर भारतात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसत आहे. दक्षिणेकडील सायक्लोनिक सर्क्युलेशन कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होतं का ते पाहावं लागणार आहे. त्यामुळे पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तामिळनाडू, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा धोका आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे.
advertisement
ऑक्टोबर हिटचा तडाखा
एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. तर दुसरीकडे अचानक दमट हवामानमुळे उकाडा वाढत आहे. त्यातच दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर परिणाम होत आहेत. हे वारे समुद्र किनाऱ्यापासून 8 किमी अंतरावरुन येत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळाचा इशारा
केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर पुढच्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देखील वातावरणावर होऊ शकतो. महाराष्ट्रात दिवाळीत पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसाचाही धोका यामुळे निर्माण होऊ शकतो. हे लो प्रेशर किती अंतरावर आणि कसं तयार होतं त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.
दिवाळीतही पावसाचा मुक्काम
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. वादळी वाऱ्यासोबत असणार आहे. तर 18 ऑक्टोबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं संकट असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे.
कधी जाणार पाऊस
20 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात राहणार आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी पाऊस नसेल हवामान कोरड राहील असा अंदाज आहे. मात्र दक्षिणेकडे पावसाचा जोर राहील. लो प्रेशर समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास तयार झालं तर पुन्हा ऑक्टोबर महिना देखील पावसाचा जाणार आहे.