भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसला तरी, त्यानंतर मात्र थंडीचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. धुळ्यात 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
advertisement
उत्तर भारतात थंडीची लाट कायम
महाराष्ट्रासोबतच उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर पश्चिम झारखंड, उत्तर आंतरिक ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थान या राज्यांमध्ये ६ आणि ७ डिसेंबर रोजी थंडीच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये थंडीची लाट अनुभवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
देशाच्या किनारपट्टीवर पावसाचे वातावरण
गेल्या २४ तासांत देशाच्या किनारपट्टीवरील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तटीय आंध्र प्रदेश, तटीय कर्नाटक, तामिळनाडू आणि रायलसीमा येथे काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, ज्यात तटीय आंध्र प्रदेशात १० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. आज दक्षिण तामिळनाडूच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटांवर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सतर्कता
महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठीही महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागाला लागून असलेल्या केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तसेच लक्षद्वीप परिसरात पुढील २४ तास मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
