एकाच वेळी तीन हवामान प्रणाली सक्रिय
हवामान तज्ज्ञ डॉ. शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकाच वेळी तीन प्रमुख हवामान प्रणाली सक्रिय आहेत, ज्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात एक डिप्रेशन सक्रिय आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण-पूर्व आणि त्याला लागून असलेल्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, हे साधारणपणे २४ ऑक्टोबरपर्यंत तयार होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्राशेजारी दक्षिणेकडील राज्यांमध्ये हायअलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कर्नाटक आणि केरळसाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत.
advertisement
महाराष्ट्रावर मोठा परिणाम: कोकण आणि मध्य महाराष्ट्र अलर्टवर
या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्पष्टपणे दिसून येईल. दक्षिण कोकण आणि गोवा या भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर रोजी पावसाचे प्रमाण कमी होईल, मात्र २६ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल आणि हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.
पुढचे 24 तास महत्त्वाचे
हवामान तज्ज्ञ डॉ. शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची तीव्रता यावर पुन्हा हवामान बदलण्याची शक्यता आहे. जर हे निम्न दाबाचे क्षेत्र तीव्र झाले नाही, तर २७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्राला अवकाळी पावसापासून खऱ्या अर्थाने सुटका मिळेल. मात्र त्याची तीव्रता वाढली, तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
गेल्या २४ तासांत दक्षिण भारतात अतिवृष्टी
मागील २४ तासांत सक्रिय असलेल्या अवदाब आणि निम्न दाबाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. यामध्ये केरळात कोझिकोड येथे सर्वाधिक १४ सेंटीमीटर पाऊस, तर तामिळनाडूमध्ये १३ सेंटीमीटर आणि दक्षिण कर्नाटकात १२ सेंटीमीटर पाऊस झाला. तमिळनाडूमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्येही २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांसाठी धोक्याचा इशारा
या हवामान प्रणालींच्या पार्श्वभूमीवर, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्र, त्याला लागून असलेला मध्य अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, तसेच कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मोठ्या लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे धोक्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मच्छिमारांनी किनाऱ्यावरच थांबावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
